Saturday, 23 July 2016

आले


अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून घेऊ शकतो.? आल्यामध्ये ९१ टक्के पाणी, २.५ टक्के प्रोटीन, १३ टक्के काबरेहायड्रेट असतात. यामुळेच याला बहुगुणी म्हटले जाते.
१.खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते.
२.तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते.
३.अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही.
४.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते.
५.सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.
६.आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.
७.ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.
८.आल्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात.
९.डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.

तुळस

तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महानअसे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजेजळजळपायांची आगतोंड येणेनाकातून रक्त येणेरक्ती मूळव्याधइत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूधकिंवा तुपाबरोबर घ्याव्यात.20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं.
सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -
एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कपइतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.

कडुनिंब


भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहेगुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव   यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे.  केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी  कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे. 
       गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते.  हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड  जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो. 
    त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच. आंघोळीच्या पाण्यात याची पाने घातली असता त्वचा मऊ, मुलायम, कांतिमान होते. अंगावर पित्त, गांध्या आल्यास पानांचा रस लावावा. त्वचारोगांवर कडुनिंबाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो. जखमेवर हे तेल, नुसता पाला लावला तरी उपयुक्त आहे. जखमेवर याचे तेल तेल लावले असता जखम लवकर भरून येते. 
   धान्याच्या कीड नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. ज्वरावर याच्या काढ्याचा उपयोग होतो.  
   हा वैराग्यवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या सेवनाने कामेच्छा कमी झाल्याचे आढळते. कडु रसाने जिभेची चव कमी होऊ शकते. मात्र दीर्घायुष्यासाठी याचे नियामेत सेवन करावे. 
   कडुनिंबाच्या पेटंटचा लढलेला लढा आपणाला माहित आहेच. कडुनिंब, हळद, इ. भारतीयांचा ठेवा आहे. त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. 
    कडूनिंब तेल असे तयार करावे
कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते.
बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.

आले- सुंठ

  आल्यापासूनच सुंठ तयार करतात. दिसायला हे अतिशय किरकोळ औषध वाटत असले तरी त्याच्या अंगी गुणधर्म खूप आहेत. आले पाकात टाकून त्याच्या वड्या करतात. ह्या आलेपाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते. अपचन, करपट ढेकर, जिभेला चव नसणे यावर आलेपाकाच्या वड्या सेवन कराव्यात. नुसत्या सुंठेनेही खूप छान भूक लागते, जिभेला चव येते. पोटात वाट साठून पोट दुखत असल्यास सुंठ कोमट पाण्यातून घ्यावी. दमा, सर्दी, खोकला यावर सुंठ मधाबरोबर चाटवावी. ‘सुंठेवाचून खोकला गेला’ अशी म्हण म्हणूनच प्रचारात आहे. सुंठ हे ७२ रोगांवरचे औषध आहे असे म्हणतात ते खरेच आहे. आयुर्वेदातले कफदोषावरील हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.

         डोके दुखत असल्यास कपाळाला सुंठेचा लेप लावावा. सर्वसाधारण तापाच्या सुरुवातीला अंग कसकस करीत असल्यास सुंठ घ्यावी. सांधेदुखी, सांधे सुजणे, यावर सुंठ व गूळ एकत्र करून खावा. त्याला गुड सुंठी योग म्हणतात. अजीर्ण होऊन जुलाब होत असल्यास सुंठ घ्यावी. अम्लपित्तावर सुंठ व साखर एकत्र करून खावी. सर्दी विशेषतः पावसाळ्यात खूप झाली असल्यास सुंठेचा काढा घ्यावा किंवा चूर्ण मधातून घ्यावे. लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावर सुंठ चूर्ण मधातून चाटवावे. सर्दीमुळे डोके दुखणे, सर्दी मोकळी न होणे, यावर सुंठ चूर्ण नाकाने हुंगावे. १ वर्षापुढील लहान मुले नीट जेवत नाहीत, भूक लागत नाही, त्यामुळे त्यांची वाढ नीट होत नाही, यावर चिमूटभर सुंठ मधातून नियमित चाटवावी. सुंठेमुळे मुलांची जंताची सवय जाते. उलट्या होत असल्यास आल्याचा रस खडीसाखरेतून किंवा मधातून चाटवावा.

         नुकतीच प्रसुती झालेल्या स्त्रियांमध्ये इतर व्याधी होऊ नयेत म्हणून ‘सौभाग्यशुन्ठी पाक’ हे औषध वापरतात. लठ्ठपणावर सुंठ कोमट पाण्यातून घेतल्यास वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

        सुंठ ऊष्ण आहे म्हणून पित्तप्रकृतीत, उन्हाळ्यात, शरद ऋतूत जपून वापर करावा.

तिळ

तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम ।  तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. 
      सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. सांधेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी यावर तिळतेलाची मालिश करतात. हे तेल व्रणरोपक आहे. अस्थी धातूवृद्धीकर म्हणून, अस्थी भग्नावर याचा चांगला उपयोग होतो. कृश व्यक्तींना स्थूल करणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे असे हे तिळाचे तेल आहे.    
     गुळ मधुर, उष्ण, पौष्टीक आहेत. तीळगूळ हा पदार्थ पौष्टीक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविणारा आहे. साखरेच्या हलव्यापेक्षा तिळगुळ हा पदार्थ आरोग्यदायक आहे. 
    संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पाण्यात तीळ घालून स्नान करतात. पाण्यात तेलाचा अंश उतरावा आणि त्वचा मऊ व्हावी हा त्यामागील उद्देश असतो. बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा त्या दिवशी बेत असतो.
    श्री गणेश जयंतीला सुद्धा तिळगुळापासून केलेल्या लाडूचा नैविद्य दाखवितात. या ना त्या कारणाने तिळगुळाचे सेवन व्हावे, अशी योजना असते. तिळगूळ वाटण्यामागे माणसाच्या मनातील स्नेह्भाव वाढावा, शत्रुत्व नाहीसे व्हावे असाही उद्देश असतो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा यातच तिळाचे महत्त्व लक्षात येते.

जिरे

आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील जिरे हा पदार्थ औषधीदृष्ट्या खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक, रुचिकर, हलके आहेत. भूक न लागणे, अजीर्ण होणे, यावर जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मुखरोग, जिभेला फोड येणे, तोंडात चट्टे पडणे या व्याधींवर जिरे बारीक कुटून पाण्यात भिजवून नंतर त्या गाळलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. 
            प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून खावे. तोंड आले असल्यास जिरे चघळावेत. कडू जिर्‍याचा धूर केला असता डास, चिलटे, किडे पळून जातात. श्वेतप्रदर, रक्तप्रदर या स्त्रियांच्या व्याधींवर जिरे आणि खडीसाखर एकत्र करून खावी. अंगात उष्णता असल्यास जिरेपूड रोज खावी. सारखी आव पडत असल्यास जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण घ्यावे. 
         अंग खाजत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ आले असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावेत. पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून, अन्नपचन व्यवस्थित व्हावे म्हणून जिरे घालून उकळून गार केलेले पाणी नियमित प्यावे. दक्षिण भारतात असे जिरेयुक्त गरम पाणी भोजनापूर्वी पिण्यास देण्याची प्रथा आहे.

आंबा

 
  आंबा हे अमृतफळ आहे. कोंकण प्रदेशाला आंबा, फणस यांनी समृद्ध केले आहे. ग्रीष्म ऋतू सुरु झाला की घरोघर आमरसाच्या मेजवान्या होतात. आंब्याबरोबर आतली कोयसुद्धा औषधी आहे. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणे, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचे चूर्ण मधातून द्यावे. पिकलेला आंबा थंड, बल वाढविणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कैरीचे पन्हे करून पितात. कैरीचा गर, गूळ यापासून कैरीचे पन्हे करतात. हे पन्हे तहान भागविणारे, दाहशामक, उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात नुसत्या पाण्याने समाधान न झाल्यास कैरीचे पन्हे घ्यावे. कैरीचे लोणचे मात्र उन्हाळ्यात खाऊ नये, ते पावसाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी थोडे खाण्यास हरकत नाही. 
    आंबा हे एक फळ असे आहे की त्याचा रस दुध मिसळून खाण्यास हरकत नाही. असा रुचकर, शक्तीवर्धक आंबा आहे.