Friday, 22 July 2016

शतावरी

संस्कृत नावः शतावरी, नारायणी, अतिरसा, वरी
मराठी- शतावरी, शतावर
हिंदी- सतावर, सतावरी, सतमुली, सरनोई
गुजराती- शतावरी
इंग्रजी- wild asparagus
लॅटिन नावः Asparagus racemosus
कुळः Liliaceae
उपयोगी अंगः मुळ्या, अंकुर
शतावरी त्रिदोषनाशक एक उत्तम रसायन आहे. शतावरी वात व पित्तशामक तर कफास वाढवणारी आहे. रसापासुन शुक्रापर्यंत सर्व शरीरधातुंना बल देणारी, बुद्धीचा तल्लखपणा वाढवणारी, डोळ्यांना हितकारक आहे. शतावरीच्या तेलास 'नारायण तेल' म्हणतात. हे तेल सर्व प्रकारच्या वातावर गुणकारी आहे. नारायण तेल (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली) पोटात घेतल्याने अर्धांगवायु, संधिवात व महिलांना फेफरे येणारा रोग बरा होतो.नारायण तेलाच्या बस्तीने सर्व प्रकारचा वायु नाहीसा होतो. स्त्रियांच्या आर्तव रोगावर या तेलाची बस्ती देतात.
पित्तप्रकोप, कुपचन व जुलाब यात शतावरी मधातुन देतात. वातरोगात शतावरी मध, दुध व पिंपळीबरोबर तर कफरोगात शतावरीचा खंडपाक देतात. शक्ती वाढवण्यासाठी शतावरीची दुधात पेज करुन खडीसाखर व जि-याबरोबर देतात. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छाती, घशाशी जळजळ, तोंडास कोरड पडणे, डोके दुखणे, आंबट-कडु ढेकर किंवा उलटी होणे, नाभीभोवती पोट दुखणे या अवस्थांमधे शतावरी अमृताप्रमाणे काम करते. कुपचनात शतावरीच्या अंकुराची भाजी देतात. यामुळे वायु सरतो, पोट साफ होते व अन्न पचते. लघवी अडत असेल, दाह होत असेल तर शतावरीचा रस दुध व साखर घालुन देतात. मूतखड्यावर शतावरीचा रस उपयुक्त आहे. स्त्रीयांच्या प्रदर रोगावर शतावरीचे चूर्ण दुधात उकळुन देतात. शतावरीच्या मुळ्या वाटुन पिंपळी, मध व दुधाबरोबर दिल्यास गर्भाशयाची पिडा कमी होते.

No comments:

Post a Comment