भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे. केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे.
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते. हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो.
त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच. आंघोळीच्या पाण्यात याची पाने घातली असता त्वचा मऊ, मुलायम, कांतिमान होते. अंगावर पित्त, गांध्या आल्यास पानांचा रस लावावा. त्वचारोगांवर कडुनिंबाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो. जखमेवर हे तेल, नुसता पाला लावला तरी उपयुक्त आहे. जखमेवर याचे तेल तेल लावले असता जखम लवकर भरून येते.
धान्याच्या कीड नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. ज्वरावर याच्या काढ्याचा उपयोग होतो.
हा वैराग्यवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या सेवनाने कामेच्छा कमी झाल्याचे आढळते. कडु रसाने जिभेची चव कमी होऊ शकते. मात्र दीर्घायुष्यासाठी याचे नियामेत सेवन करावे.
कडुनिंबाच्या पेटंटचा लढलेला लढा आपणाला माहित आहेच. कडुनिंब, हळद, इ. भारतीयांचा ठेवा आहे. त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
कडूनिंब तेल असे तयार करावे
कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते.
बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.
No comments:
Post a Comment