Friday, 22 July 2016

नीर ब्राम्ही

संस्कृत नावः ब्राम्ही, तोयवल्ली, तिक्तलोणिका, जलशाया, कपोतबंका
लॅटिन नावः Bacopa monnieri, Herpestis monniera, Moiera cunefolia
कूळ : Scrophulariaceae
इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, नीर ब्राम्ही, जलब्राम्ही,हिंदी- जलनीम, ब्रम्ही, ब्राम्ही, गुजराती- बाम, नेवरी, कडवी लुणी, जलनेवरी, इंग्रजी- थाईम लिव्हड ग्रेशिओला.
उपयोगी भागः पंचांग
ब्राम्ही (मंडुकपर्णी) व नीरब्राम्ही या दोन्ही वनस्पती सर्वसाधारणपणे सारख्या गुणधर्माच्या आहेत. परंतु, मुख्यतः मंडुकपर्णी या वनस्पतीचे कार्य त्वचेवर दिसते तर नीर ब्राम्हीचे कार्य मज्जातंतूवर दिसते. अर्थात दोन्ही वनस्पती उन्माद, अपस्मारावर उपयुक्त व मनःशांती करणा-या आहेत.
नीर ब्राम्हीची मुख्यतः क्रिया मगज व मज्जातंतूच्या रोगावर होत असते. त्यामुळे मेंदूस पुष्टी मिलते. नीर ब्राम्ही मज्जातंतुंचे पोषण करणारी, मज्जासाठी मूल्यवान व शक्तिवर्धक आहे. आचके येणे, बेशुद्ध अवस्था इ. मज्जासंस्थेच्या रोगांसाठी मानसिक रोगात हिचा वापर करतात. बुद्धी स्मरणशक्ती,व आयुष्य वाढण्यासाठी ब्राम्ही चूर्ण मधातुन देतात. ज्वरात भ्रम, प्रलाप, उन्माद इ. लक्षणे असल्यास ब्राम्हीचा लेह देतात. उदासिनपणा, मनोदौर्बल्य दूर करण्यासाठी, बुद्धीवर्धनासाठी नीर ब्राम्हीचा उपयोग होतो.
लहान मुलांच्या सर्दीत, खोकल्यात पानांचा रस देतात. यात वमनकारक व रेचक गुण असल्याने कफ उलटुन पडतो व रोग्यास आराम मिळतो. डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा लेह देतात.
नीर ब्राम्हीत 'ब्राम्हीन' नावाचे अल्कलॉईड हृदयासाठी शक्तिवर्धक आहे. ते हृदयास शक्ति आणि नियमितपणा प्रदान करते.
पित्तशमनसाठी ब्राम्हीचा स्वरस देतात. नीर ब्राम्हीमुळे लघवीचे प्रमाण वाढते. मूत्रदाह, शूल, लघवीतुन रक्त पडणे, मूतखडा यांमधे नीरब्राम्हीचा उपयोग होतो. ब्राम्ही स्वरसात, त्रिफळा, कचोरा, वाळा इ. द्रव्ये टाकुन सिद्ध केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व मनःशांतिसाठी उपयुक्त आहे.

No comments:

Post a Comment