आघाडा वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. प्रथम फुलाचा दांडा आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व ते दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते. त्याचा औषधी वापर परंपरेने होत आला आहे. दात दुखत, हलत असतील तर काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळावा. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावे म्हणजे पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खावा.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी. ती थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण द्यावे. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावे. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी बारीक वाटावे. त्यात सैंधव, मेंदीचा पाला, जाईचा पाला समभाग घालून वाटावा, त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घालावे.
जलोदरामुळे पोटाला सूज आली असेल किंवा इतर अवयवांमध्ये काही कारणांनी सूज आली असेल तर आघाड्याची राख, पाणी व गूळ एकत्र करून द्यावी. त्यामुळे सूज उतरते. त्या राखेत पाण्याऐवजी गोमूत्र घातले तरी चालते. गळवे लवकर पिकत नसतील आणि ती वारंवार होत असतील तर त्यावर आघाड्याची पाने बारीक वाटून त्यामध्ये तेल, हळद घालून गरम पोटिसासारखे गळवांवर बांधावे, म्हणजे गळवे लवकर बरी होतात. बऱ्याच व्यक्तींच्या- विशेषतः घाम जास्त येणाऱ्या व्यक्तींच्या मानेवर, छातीवर, पाठीवर, चेहऱ्यावर पांढरे भुरकट डाग पडतात, त्यातून कोंडा पडतो, त्याला "शिबं' म्हणतात. त्या शिब्यास आघाड्याच्या क्षाराचे पाणी लावावे.
आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळवावीत. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्याीत घालावीत. त्यात राखेच्या चौपट पाणी घालून चांगली कालवावी. ते पाणी न हलवता दहा ते बारा तास तसेच ठेवून द्यावे. नंतर वरचे स्वच्छ पाणी काढून गाळून घ्यावे व लोखंडाच्या कढईत घालून ते पाणी तापवून आटवावे. कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहील तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपमार्गक्षार’ - म्हणजे स्वच्छ करणारा- असे संस्कृतमध्ये नाव आहे. त्या क्षाराने पोट व दातही स्वच्छ होतात. पूर्वी परीट कपडे स्वच्छ करण्यासाठी त्याच क्षाराचा उपयोग करत असत. कानात आवाज येत असल्यास आघाड्याचे झाड मुळासकट उपटून ते बारीक कुटावे. त्यात आघाड्याच्या क्षाराचे पाणी घालावे व त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल कानात घालावे म्हणजे कर्णनाद बंद होतो. डोळे आल्यास आघाड्याच्या मुळाचे चूर्ण, थोडे सैंधव तांब्याच्या भांड्यात घालून दह्याच्या निवळीत खलवावे व ते अंजन डोळ्यात घालावे. विंचवाच्या विषारावर उपाय म्हणून आघाड्याचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावे. ते पाणी थोडे थोडे प्यायला द्यावे. पाणी कडू लागले, की विष उतरले असे समजावे.
उंदराच्या विषारावर आघाड्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा रस काढून तो सात दिवस मधाबरोबर द्यावा किंवा आघाड्याचे बी वाटून मधातून द्यावे. कुत्र्याच्या विषारावर आघाड्याचे मूळ कुटून, मध घालून द्यावे. कोरफडीचे पान व सैंधव दंशावर बांधावे. आघाड्यासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे माणसाचे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याच्या पूर्वसुरींनी त्या झाडातील गुणधर्माचा उपयोग व्हावा, तसेच ज्या ऋतूत जी झाडे येतात त्यांचा उपयोग धार्मिक आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाड्याचा समावेश केला आहे.