Saturday, 23 July 2016

आले


अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून घेऊ शकतो.? आल्यामध्ये ९१ टक्के पाणी, २.५ टक्के प्रोटीन, १३ टक्के काबरेहायड्रेट असतात. यामुळेच याला बहुगुणी म्हटले जाते.
१.खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते.
२.तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते.
३.अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही.
४.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबते.
५.सर्दी झाल्यावर आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.
६.आल्याचा रस कोमट पाण्यात १ चमचा टाकून प्यावे. तोंडातील दुर्गंधी ताबडतोब जाते.
७.ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्यास उचकी थांबते.
८.आल्यांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिबंध करता येतो. तसेच कर्करोगाच्या प्रतिकारासाठीही आलं वापरतात.
९.डोके दुखत असल्यास आल्याचा चहा प्यावा डोकेदुखी कमी होते.

तुळस

तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महानअसे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.
याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजेजळजळपायांची आगतोंड येणेनाकातून रक्त येणेरक्ती मूळव्याधइत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूधकिंवा तुपाबरोबर घ्याव्यात.20 ते 30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं.
सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -
एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कपइतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.

कडुनिंब


भारतीय संस्कृतीच्या नवीन वर्षाची सुरुवात कडुनिंबाच्या सेवनाने होते. नवीन वर्षाचे स्वागत तोंड गोड करून न करता कडु तोंड करण्याची प्रथा का आहे ? शरीरात संचित झालेल्या कफाचे शमन व्हावे हा त्यामागील उद्देश आहेगुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, आमसोल, जिरे, ओवा, सैंधव   यांची चटणी करून सकाळी अनशेपोटी खाण्याची प्रथा आहे. वर्षातून एकदा तरी ही वनस्पती खाल्ली जावी हा त्यामागील उद्देश आहे.  केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी  कडुनिंबाचे सेवन न करता वसंत ऋतूत नियमित सेवन करावे. 
       गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी सजविण्यासाठी निंबाच्या डहाळ्या बांधतात. कडुनिंबाच्या झाडामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. निंबाची वाळलेली पाने जाळली असता डासांचे प्रमाण कमी होते. निंबाचे झाड खूप वर्षे टिकते. त्यामुळे वातावरण निरोगी राहून सावलीही दाट मिळते.  हे झाड विशेष करून भारतीय उपखंडातच आढळते. झाड  जुने झाल्यावर त्याच्या खोडाला सुगंधी वास येतो. 
    त्वचारोगांवर कडुनिम्बाचा उपयोग सर्वांना माहिती आहेच. आंघोळीच्या पाण्यात याची पाने घातली असता त्वचा मऊ, मुलायम, कांतिमान होते. अंगावर पित्त, गांध्या आल्यास पानांचा रस लावावा. त्वचारोगांवर कडुनिंबाच्या तेलाचा चांगला उपयोग होतो. जखमेवर हे तेल, नुसता पाला लावला तरी उपयुक्त आहे. जखमेवर याचे तेल तेल लावले असता जखम लवकर भरून येते. 
   धान्याच्या कीड नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. ज्वरावर याच्या काढ्याचा उपयोग होतो.  
   हा वैराग्यवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या सेवनाने कामेच्छा कमी झाल्याचे आढळते. कडु रसाने जिभेची चव कमी होऊ शकते. मात्र दीर्घायुष्यासाठी याचे नियामेत सेवन करावे. 
   कडुनिंबाच्या पेटंटचा लढलेला लढा आपणाला माहित आहेच. कडुनिंब, हळद, इ. भारतीयांचा ठेवा आहे. त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. 
    कडूनिंब तेल असे तयार करावे
कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते.
बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.

आले- सुंठ

  आल्यापासूनच सुंठ तयार करतात. दिसायला हे अतिशय किरकोळ औषध वाटत असले तरी त्याच्या अंगी गुणधर्म खूप आहेत. आले पाकात टाकून त्याच्या वड्या करतात. ह्या आलेपाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते. अपचन, करपट ढेकर, जिभेला चव नसणे यावर आलेपाकाच्या वड्या सेवन कराव्यात. नुसत्या सुंठेनेही खूप छान भूक लागते, जिभेला चव येते. पोटात वाट साठून पोट दुखत असल्यास सुंठ कोमट पाण्यातून घ्यावी. दमा, सर्दी, खोकला यावर सुंठ मधाबरोबर चाटवावी. ‘सुंठेवाचून खोकला गेला’ अशी म्हण म्हणूनच प्रचारात आहे. सुंठ हे ७२ रोगांवरचे औषध आहे असे म्हणतात ते खरेच आहे. आयुर्वेदातले कफदोषावरील हे अतिशय महत्त्वाचे औषध आहे.

         डोके दुखत असल्यास कपाळाला सुंठेचा लेप लावावा. सर्वसाधारण तापाच्या सुरुवातीला अंग कसकस करीत असल्यास सुंठ घ्यावी. सांधेदुखी, सांधे सुजणे, यावर सुंठ व गूळ एकत्र करून खावा. त्याला गुड सुंठी योग म्हणतात. अजीर्ण होऊन जुलाब होत असल्यास सुंठ घ्यावी. अम्लपित्तावर सुंठ व साखर एकत्र करून खावी. सर्दी विशेषतः पावसाळ्यात खूप झाली असल्यास सुंठेचा काढा घ्यावा किंवा चूर्ण मधातून घ्यावे. लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावर सुंठ चूर्ण मधातून चाटवावे. सर्दीमुळे डोके दुखणे, सर्दी मोकळी न होणे, यावर सुंठ चूर्ण नाकाने हुंगावे. १ वर्षापुढील लहान मुले नीट जेवत नाहीत, भूक लागत नाही, त्यामुळे त्यांची वाढ नीट होत नाही, यावर चिमूटभर सुंठ मधातून नियमित चाटवावी. सुंठेमुळे मुलांची जंताची सवय जाते. उलट्या होत असल्यास आल्याचा रस खडीसाखरेतून किंवा मधातून चाटवावा.

         नुकतीच प्रसुती झालेल्या स्त्रियांमध्ये इतर व्याधी होऊ नयेत म्हणून ‘सौभाग्यशुन्ठी पाक’ हे औषध वापरतात. लठ्ठपणावर सुंठ कोमट पाण्यातून घेतल्यास वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

        सुंठ ऊष्ण आहे म्हणून पित्तप्रकृतीत, उन्हाळ्यात, शरद ऋतूत जपून वापर करावा.

तिळ

तिळाचे आयुर्वेदात फार महत्त्व वर्णन केलेले आहे. तिलोद्भवम तैलम ।  तिळापासून निघते ते तेल होय. म्हणूनच तेलाला ’तेल’ हे नाव प्राप्त झाले. तेलात तीळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. शिशिर ऋतूत शरीरातील स्नेह कमी झालेला असतो, रुक्षता वाढलेली असते. अशा वेळी तिळाचे नियमित सेवन करावे. तीळ हे मधुर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टीक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. 
      सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आहे. हिवाळ्यात तिळतेलाने अंगाला अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. सांधेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी यावर तिळतेलाची मालिश करतात. हे तेल व्रणरोपक आहे. अस्थी धातूवृद्धीकर म्हणून, अस्थी भग्नावर याचा चांगला उपयोग होतो. कृश व्यक्तींना स्थूल करणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे असे हे तिळाचे तेल आहे.    
     गुळ मधुर, उष्ण, पौष्टीक आहेत. तीळगूळ हा पदार्थ पौष्टीक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविणारा आहे. साखरेच्या हलव्यापेक्षा तिळगुळ हा पदार्थ आरोग्यदायक आहे. 
    संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पाण्यात तीळ घालून स्नान करतात. पाण्यात तेलाचा अंश उतरावा आणि त्वचा मऊ व्हावी हा त्यामागील उद्देश असतो. बाजरीची भाकरी, लोणी, खिचडी असा त्या दिवशी बेत असतो.
    श्री गणेश जयंतीला सुद्धा तिळगुळापासून केलेल्या लाडूचा नैविद्य दाखवितात. या ना त्या कारणाने तिळगुळाचे सेवन व्हावे, अशी योजना असते. तिळगूळ वाटण्यामागे माणसाच्या मनातील स्नेह्भाव वाढावा, शत्रुत्व नाहीसे व्हावे असाही उद्देश असतो. एक तीळ सात जणांनी वाटून खावा यातच तिळाचे महत्त्व लक्षात येते.

जिरे

आपल्या रोजच्या स्वयंपाकघरातील जिरे हा पदार्थ औषधीदृष्ट्या खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक, रुचिकर, हलके आहेत. भूक न लागणे, अजीर्ण होणे, यावर जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मुखरोग, जिभेला फोड येणे, तोंडात चट्टे पडणे या व्याधींवर जिरे बारीक कुटून पाण्यात भिजवून नंतर त्या गाळलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. 
            प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून खावे. तोंड आले असल्यास जिरे चघळावेत. कडू जिर्‍याचा धूर केला असता डास, चिलटे, किडे पळून जातात. श्वेतप्रदर, रक्तप्रदर या स्त्रियांच्या व्याधींवर जिरे आणि खडीसाखर एकत्र करून खावी. अंगात उष्णता असल्यास जिरेपूड रोज खावी. सारखी आव पडत असल्यास जि‍‍‌‌र्‍याचे चूर्ण घ्यावे. 
         अंग खाजत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ आले असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावेत. पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून, अन्नपचन व्यवस्थित व्हावे म्हणून जिरे घालून उकळून गार केलेले पाणी नियमित प्यावे. दक्षिण भारतात असे जिरेयुक्त गरम पाणी भोजनापूर्वी पिण्यास देण्याची प्रथा आहे.

आंबा

 
  आंबा हे अमृतफळ आहे. कोंकण प्रदेशाला आंबा, फणस यांनी समृद्ध केले आहे. ग्रीष्म ऋतू सुरु झाला की घरोघर आमरसाच्या मेजवान्या होतात. आंब्याबरोबर आतली कोयसुद्धा औषधी आहे. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणे, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचे चूर्ण मधातून द्यावे. पिकलेला आंबा थंड, बल वाढविणारा आहे. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी कैरीचे पन्हे करून पितात. कैरीचा गर, गूळ यापासून कैरीचे पन्हे करतात. हे पन्हे तहान भागविणारे, दाहशामक, उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यात नुसत्या पाण्याने समाधान न झाल्यास कैरीचे पन्हे घ्यावे. कैरीचे लोणचे मात्र उन्हाळ्यात खाऊ नये, ते पावसाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी थोडे खाण्यास हरकत नाही. 
    आंबा हे एक फळ असे आहे की त्याचा रस दुध मिसळून खाण्यास हरकत नाही. असा रुचकर, शक्तीवर्धक आंबा आहे.    

लसूण

लसूणामध्ये लवण रस वगळता उरलेले पाचही रस आहेत. लसणाने जिभेला चव येऊन भूकही उत्तम लागते. म्हणून जेवणात लसणाचा वापर करतात. विशेषतः पावसाळ्यात लसणाचा भरपूर वापर करावा. पोटात वाट साठणे, पोट गडगडणे, पोट दुखणे यावर लसूण खाऊन वर कोमट पाणी प्यावे. सर्दी, खोकला, नाक वाहणे, शिंका येणे, खोकला यावर गरम कडकडीत फुटाणे व कच्चा लसूण चावून खावा. मात्र त्यावर पाणी पिऊ नये. कानात आवाज येणे, कान दुखणे यावर लसूण व तीळ तेलात कडकडून ते तेल कोमट झाल्यावर नित्य कानात घालावे. मात्र कान फुटला असताना तेल अजिबात घालू नये. रक्तातील कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण लसणाने कमी होते, हे सिद्ध झालेले आहे. हृदयरोग असणारे, रक्तवाहिनीत अडथळा असणारे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे व्यक्ती यांनी कच्चा लसूण खावा. सांधे सुजणे, दुखणे यावर लसणाचा उपयोग होतो. लसूण बुद्धिवर्धक आहे. लसूण नित्य खाण्याने बुद्धी तरतरीत व तल्लख होते. लहान मुलांना लसूण दिल्याने पोटातील जंत मरतात. मुरडा येऊन आव पडत असल्यास लसूण खावा. अर्धे डोके दुखत असल्यास लसणाचा रस नाकात सोडावा.

कुळीथ / कुलित्थ (हुलगे

हिवाळा आला की शेंगोळे किंवा कुळीथाच्या जिलब्या घरोघर केल्या जातात. कुळीथाचे पिठलेही फार प्रसिध्द आहे. नाशिक, धुळे जिल्ह्यात वरील पदार्थ फार फार प्रसिध्द आहेत. ताकाबरोबर केलेले  कुळीथाचे कालवण खूपच चविष्ट लागते. कुळीथालाच हुलगे तर संस्कृतमध्येकुलित्थ असे म्हणतात. 
     कुळीथ हे अतिशय उष्ण आहेत. म्हणून कुळीथ फक्त हिवाळ्यात खातात. इतर ऋतूत त्याचा वापर करू नये. तसेच पित्तप्रकृतीच्या माणसांनी याचे जपून सेवन करावे. कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्यानेही चरबी कमी होते. अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उद्वर्तन (उटणे) लावल्याने खूप चांगला उपयोग होतो.
     मूतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना (रीनल कोलीक) कमी करण्यासाठी वापरतात.  
     पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो. पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो. खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा. 
     आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. पण डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. 
     कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो. 
    उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये.   

सीताफळ

   
सीताफळ हे अतिशय थंड आहे. म्हणूनच शीतफळ-शीताफळ-सीताफळ असे याला म्हणतात. सीताफळे साधारणपणे शरद ऋतूच्या शेवटी येतात. मात्र हे फळ थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा. ही फळे गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत. 

                  सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुलाम्नां लावाव्या. नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे. 
                   लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.  

आघाडा

आघाडा वनस्पती पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून, थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. प्रथम फुलाचा दांडा आखूड असतो; परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे जनावरांच्या अंगाला चिकटतात व ते दूरवर पसरतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ही वनस्पती सापडते. त्याचा औषधी वापर परंपरेने होत आला आहे. दात दुखत, हलत असतील तर काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळावा. पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खावीत किंवा पानांचा रस काढून प्यावा. पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून द्यावे म्हणजे पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खावा.
खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची राख करावी. ती थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण द्यावे. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण द्यावे. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात. सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी बारीक वाटावे. त्यात सैंधव, मेंदीचा पाला, जाईचा पाला समभाग घालून वाटावा, त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घालावे.
जलोदरामुळे पोटाला सूज आली असेल किंवा इतर अवयवांमध्ये काही कारणांनी सूज आली असेल तर आघाड्याची राख, पाणी व गूळ एकत्र करून द्यावी. त्यामुळे सूज उतरते. त्या राखेत पाण्याऐवजी गोमूत्र घातले तरी चालते. गळवे लवकर पिकत नसतील आणि ती वारंवार होत असतील तर त्यावर आघाड्याची पाने बारीक वाटून त्यामध्ये तेल, हळद घालून गरम पोटिसासारखे गळवांवर बांधावे, म्हणजे गळवे लवकर बरी होतात. बऱ्याच व्यक्तींच्या- विशेषतः घाम जास्त येणाऱ्या व्यक्तींच्या मानेवर, छातीवर, पाठीवर, चेहऱ्यावर पांढरे भुरकट डाग पडतात, त्यातून कोंडा पडतो, त्याला "शिबं' म्हणतात. त्या शिब्यास आघाड्याच्या क्षाराचे पाणी लावावे.
आघाड्याचा क्षार काढण्यासाठी आघाड्याची झाडे सावलीत वाळवावीत. नंतर त्यांची राख करून ती मातीच्या मडक्याीत घालावीत. त्यात राखेच्या चौपट पाणी घालून चांगली कालवावी. ते पाणी न हलवता दहा ते बारा तास तसेच ठेवून द्यावे. नंतर वरचे स्वच्छ पाणी काढून गाळून घ्यावे व लोखंडाच्या कढईत घालून ते पाणी तापवून आटवावे. कढईच्या तळाशी जो पांढरा क्षार राहील तो आघाड्याचा क्षार. त्या क्षाराला ‘अपमार्गक्षार’ - म्हणजे स्वच्छ करणारा- असे संस्कृतमध्ये नाव आहे. त्या क्षाराने पोट व दातही स्वच्छ होतात. पूर्वी परीट कपडे स्वच्छ करण्यासाठी त्याच क्षाराचा उपयोग करत असत. कानात आवाज येत असल्यास आघाड्याचे झाड मुळासकट उपटून ते बारीक कुटावे. त्यात आघाड्याच्या क्षाराचे पाणी घालावे व त्याच्या निम्मे तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवावे. ते तेल कानात घालावे म्हणजे कर्णनाद बंद होतो. डोळे आल्यास आघाड्याच्या मुळाचे चूर्ण, थोडे सैंधव तांब्याच्या भांड्यात घालून दह्याच्या निवळीत खलवावे व ते अंजन डोळ्यात घालावे. विंचवाच्या विषारावर उपाय म्हणून आघाड्याचे तुरे किंवा मुळी पाण्यात उगाळून ते पाण्यात कालवावे. ते पाणी थोडे थोडे प्यायला द्यावे. पाणी कडू लागले, की विष उतरले असे समजावे.
उंदराच्या विषारावर आघाड्याच्या कोवळ्या तुऱ्यांचा रस काढून तो सात दिवस मधाबरोबर द्यावा किंवा आघाड्याचे बी वाटून मधातून द्यावे. कुत्र्याच्या विषारावर आघाड्याचे मूळ कुटून, मध घालून द्यावे. कोरफडीचे पान व सैंधव दंशावर बांधावे. आघाड्यासारख्या छोट्या पण मौल्यवान झाडाकडे माणसाचे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याच्या पूर्वसुरींनी त्या झाडातील गुणधर्माचा उपयोग व्हावा, तसेच ज्या ऋतूत जी झाडे येतात त्यांचा उपयोग धार्मिक आचार-विचारांमधून, व्रतवैकल्यांतून केलेला आहे. श्रावणात मंगळागौरीच्या दिवशी मंगळागौरीच्या पत्रींमध्ये आघाड्याचा समावेश केला आहे.

मेथी

मेथीची पालेभाजी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात मेथीच्या भाजीचे उत्पादन खूप होते. तसेच मेथीचे बी बाजारात मिळते. या मेथीच्या बीपासून मेथीचे लाडू तयार करतात. हे लाडू हिवाळ्यात, हेमंत, शिशिर ऋतूत खातात. मेथीचे लाडू अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक असतात. मेथीची भाजीसुद्धा अतिशय  पौष्टिक असते. तुरीच्या डाळीबरोबर मेथीचे दाणे एकत्र करून त्याचे कालवण करतात. त्याला 'पेंडपालं' असे म्हणतात.  
     बाळन्तिणीला डिंकाचे, मेथीचे लाडू खायला देतात. प्रसूतीकाळात झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी हा आहार देतात. मेथीमुळे बाळन्तिणीच्या अंगावरचे दूधसुद्धा वाढते. तसेच गर्भाशय शोधन होते. प्रसूतीकाळात गर्भाशयात साचलेल्या, साठलेल्या दोषांचा निचरा करण्यासाठी मेथी उपयुक्त आहे.  
     मेथीच्या बिया शरीरातील अतिरिक्त मेद कमी करतात. बियांचे चूर्ण नियमित घेतल्यास मेद कमी होतो. प्रमेहावर मेथीच्या बियांचा चांगला उपयोग होतो. रक्तातील साखर वाढणे, वारंवार लघवीला जावे लागणे, बैठ्या जीवनशैलीमुळे होणारा मधुमेह (टाईप २) यावर दाणामेथीचा चांगला उपयोग होतो. 
    विविध वाताचे विकार, कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखी यावर मेथीचा चांगला उपयोग होतो. मेथीमुळे भूकही चांगली लागते. वातामुळे पोट दुखत असल्यास मेथीच्या बिया पाण्यातून घ्याव्यात. 
    आमांश, अतिसार यावरही दाणामेथी वापरतात. 
    अम्लपित्ताचा त्रास असनारया व्यक्तींनी तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी मात्र मेथीचा जपून वापर करावा. मेथी ही पचायला जड आणि उष्ण आहे. म्हणून हिवाळ्यात मेथीचा वापर करतात.

Friday, 22 July 2016

बेल



 बेलाच्या बेलफळांचा बेलमुरब्बा करतात. बेलमुरब्ब्याचा उपयोग अतिसार, जुलाब यावर खूप चांगला होतो.
आव पडणे, शेम चिकट पडणे, संडास वाटे रक्त पडणे, यावर बेलफलातील गर किंवा बेलमुराब्बा द्यावा. 
  लहान मुलांना सारखी आव होत असेल तर त्यावरही बेलमुरब्बा देतात.  मुलांना जंत झाले असल्यास बेलाच्या पानांचा रस द्यावा. अम्लपित्तावरही बेलाच्या पानांचा रस देतात. 
    शरीराला घामामुळे दुर्गंधी येत असेल तर बेलाच्या पानांचा रस लावावा. घामाची दुर्गंधी येण्याचे बंद होते. उलट्या होत असल्यास बेलफळाच्या सालीचा काढा प्यावा. 
  दमा, खोकला यावर बेलाच्या पानांचा काढा द्यावा. तोंड आले असल्यास बेलाच्या सालीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात. तोंड येणे, तोंडात जखम होणे, फोड येणे, यावर या काढ्याचा खूप उपयोग होतो. मूळव्याध, मलावष्टंभ यावर बेलाच्या पानांचा रस द्यावा. 
     बेलापासून 'बिल्वावलेह' तयार करतात. शौचाला शेम चिकट पडणे, आव पडणे, रक्तमिश्रीत आव पडणे, खूप कुन्थूनही थोडीशीच शौचाला होणे यावर बिल्वावलेहाचा खूप चांगला उपयोग होतो.  

औदुंबर (उंबर)

भगवान दत्तात्रेयांना औदुम्बराचे झाड अतिशय प्रिय आहे. औदुम्बराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचा वास असतो. दत्तजयन्तीच्या वेळी आपण औदुम्बराची पूजा करतो, त्यानिमित्ताने आपण त्याच्या अंगी असणाया गुणांची माहिती घेऊ या. 
    पुराणामध्येही अशी एक कथा आढळते की नरसिंव्हाने जेव्हा हिरण्यकश्यपू या राक्षसाचा पोट फाडून वध केला तेव्हा त्याच्या हाताच्या नखान्ची खूप आग व्हायला लागली. त्यावेळी त्याने आपली नखे उंबराच्या झाडात खुपसली, तेव्हा ती आग शान्त झाली. त्यातील कथेचा भाग सोडला तरी उंबर हे अतिशय थंड आहे, हे आपल्या लक्षात येते. 
    उंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी असते, असे म्हणतात.  उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात. 
    उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. अंगावरून जास्त जाणे या स्त्रियांच्या विकारात फळे, सालीचा काढा घ्यावा. सारखे जुलाब होत असल्यास उंबराचा चीक साखरेतून खावा. 
   लहान मुलांच्या गोवर, कांजिण्या यामध्ये होणाऱ्या उष्णतेवर उंबराचा रस किंवा सालीचे चूर्ण मधातून चाटवावे. मुलांच्या नाकातून घोळाणा फुटणे यावर फळांचा उपयोग होतो. 
   खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान न होणे, सारखी खा खा सुटणे, या भस्मक रोगावर सालीचे चूर्ण किंवा मुळाचे पाणी द्यावे. 
  जुन्या उंबराचे मूळ कापून त्याखाली भांडे ठेवावे, म्हणजे त्यामध्ये मुळाचे पाणी साठेल. हे पाणी अतिशय थंड असते. उंबरापासून ’उदुंबरावलेह’ करतात, तो ही थंड आहे.

बहावा

 रखरखीत उन्हाळ्यात झाडे सुकलेली असताना गुलमोहोर, बहावा ही झाडे मात्र खूप फुललेली असतात. बहावा उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी फुलतो. काही ठिकाणी बहाव्याच्या फुलांची भाजी करतात. याला फळे म्हणजे शेंगा येतात. शेंग चांगली जाड लाटण्यासारखी असते. शेंगेत बिया व मगज असतो. 
बहाव्याच्या मगजाचा खूप औषधी उपयोग आहे. मगज सौम्य रेचक आहे. बहावा मगज हा दुधात कोळून साखर घालून रात्री घेतल्यास दुस-या दिवशी शौचास साफ होते. जुलाब मात्र होत नाहीत. कोणत्याही वयाच्या माणसास शौचास साफ होण्यासाठी मगज वापरतात. यापासून तयार केलेल्या आरग्वध कपिला वटीचा उपयोग सौम्य रेचनासाठी उत्तम होतो. गोड, थंड असल्यामुळे पित्तदोषावर खूप उपयुक्त आहे. यकृताच्या कार्याला मगजाच्या सेवनाने उत्तेजना मिळते. 
बियांचे चूर्ण मधुमेहवर उपयुक्त आहे. 
त्वचारोगांवर बहाव्याच्या पानांचा उपयोग होतो. बहाव्याचा कोवळा पाला वाटून त्वचारोगांवर लावावा. 

दुर्वा

दुर्वा ह्या स्त्रियांच्या गर्भाशयाचे उत्तम टोनिक समजल्या जातात. गर्भाशयाला बलकारक, गर्भपोषणासाठी उपयुक्त तसेच गर्भाशयाची आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांचा खूप उपयोग होतो. मासिक पाळीच्या समस्यांवर दुर्वांचा रस पोटात घ्यावा. 
        नाकातून घोळाणा फुटत असल्यास दुर्वांचा रस नाकात पिळावा. दुर्वा ह्या थंड आणि तहान भागविणाऱ्या आहेत. जखमेतून रक्तस्त्राव होत असून तो लवकर थांबण्यासाठी दुर्वांचा रस लावावा. 
      लघवीला आग होणे, लघवी कमी होणे, कळ लागून लघवी होणे, लघवी साफ न होणे या सर्व लघवीच्या विकारांवर दुर्वांचा रस घ्यावा. 
     डोळे येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, यावर दुर्वांच्या रसाचे थेंब डोळ्यात टाकावेत, पोटातही घ्यावेत. 
     उलट्या होत असल्यास तांदूळ धुतलेल्या पाण्यात दुर्वांचा रस घालून प्यावा. सारखी उचकी लागत असल्यास दुर्वांच्या मुळांचा रस आणि मध एकत्र करून प्यावे. 
     अंगाची आग होणे, उष्णतेजवळ काम केल्याने त्वचा लाल होणे, पुरळ उठणे यावर दुर्वांचा रस लावावा आणि पोटातही घ्यावां. 
    अशा ह्या बहुगुणी आणि बहुपयोगी दुर्वा आहेत. दिसायला अतिशय क्षुद्र असल्या तरी गणपतीने त्यांना आपलेसे केले ते त्यांच्या उपयुक्त गुणांमुळेच.   

हिरडा

हिरडा म्हणजे हरीतकी ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत. नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी म्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.

          भूक न लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलावष्टम्भावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.

          हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी हे रसायन आहे. रोज हिरडा चूर्ण सेवन केल्याने शरीर निरोगी रहाते. बुद्धी तरतरीत रहाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. घाम जास्त येत असल्यास आंघोळीच्या वेळी अंगाला हिरडा चूर्ण लावावे. लहान मुलांना काही वेळा संडासाला होत नाही, कुंथावे लागते. अशा वेळी हिरडा पाण्यात उगाळून चाटवावा. दमा, उचकी लागणे यावर हिरडा, सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. अजीर्ण, भूक न लागणे यावर सुरवारी हिरडा आणि सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. काविळीवर हिरड्याचा चांगला उपयोग होतो. 
          असा हा हिरडा अनेक व्याधींवर गुणकारी आहे.

अक्कलकारा

 या वनस्पतीच्या नावातच तिचे गुणधर्म सामावलेले आहेत. मुलांना लहानपणी वडीलधारी माणसे अक्कलकारा तूप-भातात मिसळून खायला देत असत. मुलांनी लवकर बोलावे, स्पष्ट बोलावे यासाठी ते देत. 
लहान मुले बोलायला शिकताना सुरुवातीला बोबडे बोलतात. पहिल्या-पहिल्यांदा या बोबड्या बोलांचे कौतुक होते. मात्र काही काही वेळा मुलाचे वय वाढत जाते, पण त्याची बोबडे बोलायची सवय काही जात नाही. अशावेळी मुलांचे शब्दोच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून त्यांना अक्कलकारा खायला देतात. अक्कलकारा हा जिभेला चुरचुरणारा, किंचित तिखट असल्याने लहान मुले लवकर खात नाहीत. अशा वेळी युक्ती प्रयुक्तीने भातात मिसळून तूप मीठ टाकून अक्कलकारा नियमित खायला द्यावा. याच्या सेवनाने आवाज चांगला, शब्दोच्चार स्पष्ट, बुद्धी तल्लख होते.
                  विविध मानसिक आजारांवर अक्कलका-याचा खूप चांगला उपयोग होतो. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक आजारांवर याचा चांगला उपयोग होतो. 
                  ज्याला उत्तम वक्ता व्हायचे आहे त्याने अक्कलकारा नियमित खावा. शिक्षकी पेशा, निवेदक, समालोचक, सतत बोलण्याचा पेशा असणारे यांनी अक्कलकारा सेवन करावा. 
                  अक्कलका-याच्या बोंडांचा औषध म्हणून वापर करतात. या वनस्पतीमुळे वाणी शुद्ध होऊन बुद्धीही तल्लख होते.  

धोतरा

धोतरा ही अतिशय विषारी वनस्पती आहे. पण योग्य मात्रेत, योग्य वेळी, आणि तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने औषधात वापरला असता गुणकारी ठरतो.

          याचा उपयोग प्रामुख्याने ‘दमा’ या व्याधीत होतो. दम्यात श्वासवाहिन्यांचा व्यास कमी झालेला असतो. त्यामुळे प्राणवायूचा पुरेसा पुरवठा शरीराला होत नाही. अशा वेळी धोत-याचा वापर केला असता श्वासवाहिन्या मोकळ्या होतात. तसेच साठलेल्या कफाचा नाश होऊन दमा दूर होतो. धोत-याच्या पानांची नुसती धुरी घेतली तरी दम्याची लक्षणे लगेच कमी होतात.

         यापासून कनकासव करतात. तसेच त्रिभुवनकीर्ती या प्रसिध्द औषधात धोत-याचा वापर करतात. म्हणून ही औषधे घेताना वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी धोत-याचा जपून वापर करावा.

          धोत-याच्या काळा आणि पांढरा  अशा दोन जाती आहेत. काळा धोतरा जास्त गुणकारी आहे. खोकला, कफ यावर धोत-याचा खूप उपयोग होतो.   

एरंड

शेराचा उपयोग कानदुखीवर करतात.  त्यांच्या कांड्या नीट काढाव्या. त्याचा सफेद रंगाचा चीक येतो म्हणून सांभाळून तोडाव्या. चीक डो़ळ्यात उडता कामा नये. त्या कांड्या धूवून तव्यावर शेकाव्या. नंतर ठेचून त्याचा रस गाळून घ्यावा आणि दुखणार्‍या कानात घालावा.
सूज आणि दुखीवरही एरंडाची पाने गरम करुन शेकतात.
एरंडाची ही पाने थोड्या पाण्याबरोबर वाटुन त्याचा लेप पायाच्या भेगांवर लावायचा, भेगा लगेच भरुन येतात

घाणेरी

लॅटीन नावः Lantana camara L. var. aculeata
कुळ : Verbenaceae (निर्गुडी कुळ)
इतर नावे: तांतानी
उपयोगी भागः मूळ
निर्गुडी कुळातली अतिशय उपयुक्त वनस्पती...पण ग्रंथोक्त नसल्याने वापरली जात नाही. ही शिवण, सागवान किंवा जीतसाया यापेक्षा अधिक तीव्र पण निर्गुडीपेक्षा सौम्य आहे. "Fistula in ano" या दुर्धर आजारात घाणेरीच्या मुळांचा काढा दारुहळद, देवदार, मंजिष्ठा यांबरोबर वापरल्यास शस्रक्रियेची गरज रहात नाही किंवा त्याची व्याप्ती तेवढी कमी करता येते. घाणेरी सागवान किंवा शिवणप्रमाणे गर्भ संरक्षक म्हणुन वापरता येत नसली तरी गर्भ रहावा म्हणुन गर्भाशयाच्या शोधनकार्यात या दोन्ही वनस्पतींपेक्षा उजवी ठरते. घाणेरीच्या मुळांच्या चुर्णाने खाज असणारी, ठणकणारी, रक्तस्त्राव होणारी मूळव्याध ताबडतोब कमी होते तसेच याबरोबर हिरडाचूर्ण वापरल्यास मूळव्याध पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होतो.

शतावरी

संस्कृत नावः शतावरी, नारायणी, अतिरसा, वरी
मराठी- शतावरी, शतावर
हिंदी- सतावर, सतावरी, सतमुली, सरनोई
गुजराती- शतावरी
इंग्रजी- wild asparagus
लॅटिन नावः Asparagus racemosus
कुळः Liliaceae
उपयोगी अंगः मुळ्या, अंकुर
शतावरी त्रिदोषनाशक एक उत्तम रसायन आहे. शतावरी वात व पित्तशामक तर कफास वाढवणारी आहे. रसापासुन शुक्रापर्यंत सर्व शरीरधातुंना बल देणारी, बुद्धीचा तल्लखपणा वाढवणारी, डोळ्यांना हितकारक आहे. शतावरीच्या तेलास 'नारायण तेल' म्हणतात. हे तेल सर्व प्रकारच्या वातावर गुणकारी आहे. नारायण तेल (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली) पोटात घेतल्याने अर्धांगवायु, संधिवात व महिलांना फेफरे येणारा रोग बरा होतो.नारायण तेलाच्या बस्तीने सर्व प्रकारचा वायु नाहीसा होतो. स्त्रियांच्या आर्तव रोगावर या तेलाची बस्ती देतात.
पित्तप्रकोप, कुपचन व जुलाब यात शतावरी मधातुन देतात. वातरोगात शतावरी मध, दुध व पिंपळीबरोबर तर कफरोगात शतावरीचा खंडपाक देतात. शक्ती वाढवण्यासाठी शतावरीची दुधात पेज करुन खडीसाखर व जि-याबरोबर देतात. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे छाती, घशाशी जळजळ, तोंडास कोरड पडणे, डोके दुखणे, आंबट-कडु ढेकर किंवा उलटी होणे, नाभीभोवती पोट दुखणे या अवस्थांमधे शतावरी अमृताप्रमाणे काम करते. कुपचनात शतावरीच्या अंकुराची भाजी देतात. यामुळे वायु सरतो, पोट साफ होते व अन्न पचते. लघवी अडत असेल, दाह होत असेल तर शतावरीचा रस दुध व साखर घालुन देतात. मूतखड्यावर शतावरीचा रस उपयुक्त आहे. स्त्रीयांच्या प्रदर रोगावर शतावरीचे चूर्ण दुधात उकळुन देतात. शतावरीच्या मुळ्या वाटुन पिंपळी, मध व दुधाबरोबर दिल्यास गर्भाशयाची पिडा कमी होते.

पांढरा कुडा

नावः पांढरा कुडा, इंद्रजव, कोरया, कडो
संस्कृत नावः कुटज, गिरीमल्लिका, वत्सक, इंद्रजव, कलिंग, भद्रयव
लॅटिन नावः Holarrhena pubescens (Butch. Ham.) Wall.ex G. Don
कूळः Apocynaceae (करवंद कूळ)
उपयोगी भागः सर्व भाग
उपयोगः कुड्याचा अतिसारावरील उपयोग सर्वश्रुत आहे. कुडा असलेले लघुगंगाधर चूर्ण अल्सरेटिव कोलायटिस विकारावर कोणत्याही अ‍ॅलोपॅथिक औषधापेक्षा श्रेष्ठ आहे. लहान मुलांना नेहमी होणारी सर्दी, बालदमा यावर कुड्याच्या पानांचा रस, काळी मिरीच्या दोन दाण्यांबरोबर दिला असता बालदमा होण्याची प्रवृत्ती कमी होते.
सामान्य अतिसारावरही हे चूर्ण उपयुक्त आहे. कुडासाल, खैरसाल, करंजसाल, नागरमोथा, पळससाल एकत्र घेतल्यास जास्त वजन असलेल्या व्यक्तींच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे. वरचेवर होणारी टॉन्सीलची सूज, चिकट शेंबुड व तोंडाला येणारा वास कुडापाळ (मुळाची / खोडाची साल) व दारुहळद यांच्या काढ्याने बरे होतात.

कपाळफोडी

नावः कपाळफोडी
संस्कृत नावः काकमर्दनिका, कर्णस्फोटा
लॅटिन नावः Cardiospermum helicacabum L.
कूळः Sapindaceae (रिठा कूळ)
इतर नावे: कानफुटी, लटाफटकी, नयफटकी, कनफूटी, करोटीओ
उपयोगी भागः पाने
उपयोगः याच्या पानांचा रस कान फुटल्यास वापरतात. नविन संधीवातात ही वनस्पती उपयुक्त आहे. पण एकेरी वापरु नये, उलट्या जुलाब होऊन उपयोगी पडत नाही, त्याबरोबर सुगंधी वनस्पती घ्याव्या लागतात. कपाळफोडीच्या पानांचा रस, कंकोळ, दालचिनी, लेंडीपिंपळी, एरंडेल किंवा एरंडीच्या पानांचा रसातुन घेतल्यास संधीवात सुरवातीसच कमी होतो.

नीर ब्राम्ही

संस्कृत नावः ब्राम्ही, तोयवल्ली, तिक्तलोणिका, जलशाया, कपोतबंका
लॅटिन नावः Bacopa monnieri, Herpestis monniera, Moiera cunefolia
कूळ : Scrophulariaceae
इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, नीर ब्राम्ही, जलब्राम्ही,हिंदी- जलनीम, ब्रम्ही, ब्राम्ही, गुजराती- बाम, नेवरी, कडवी लुणी, जलनेवरी, इंग्रजी- थाईम लिव्हड ग्रेशिओला.
उपयोगी भागः पंचांग
ब्राम्ही (मंडुकपर्णी) व नीरब्राम्ही या दोन्ही वनस्पती सर्वसाधारणपणे सारख्या गुणधर्माच्या आहेत. परंतु, मुख्यतः मंडुकपर्णी या वनस्पतीचे कार्य त्वचेवर दिसते तर नीर ब्राम्हीचे कार्य मज्जातंतूवर दिसते. अर्थात दोन्ही वनस्पती उन्माद, अपस्मारावर उपयुक्त व मनःशांती करणा-या आहेत.
नीर ब्राम्हीची मुख्यतः क्रिया मगज व मज्जातंतूच्या रोगावर होत असते. त्यामुळे मेंदूस पुष्टी मिलते. नीर ब्राम्ही मज्जातंतुंचे पोषण करणारी, मज्जासाठी मूल्यवान व शक्तिवर्धक आहे. आचके येणे, बेशुद्ध अवस्था इ. मज्जासंस्थेच्या रोगांसाठी मानसिक रोगात हिचा वापर करतात. बुद्धी स्मरणशक्ती,व आयुष्य वाढण्यासाठी ब्राम्ही चूर्ण मधातुन देतात. ज्वरात भ्रम, प्रलाप, उन्माद इ. लक्षणे असल्यास ब्राम्हीचा लेह देतात. उदासिनपणा, मनोदौर्बल्य दूर करण्यासाठी, बुद्धीवर्धनासाठी नीर ब्राम्हीचा उपयोग होतो.
लहान मुलांच्या सर्दीत, खोकल्यात पानांचा रस देतात. यात वमनकारक व रेचक गुण असल्याने कफ उलटुन पडतो व रोग्यास आराम मिळतो. डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा लेह देतात.
नीर ब्राम्हीत 'ब्राम्हीन' नावाचे अल्कलॉईड हृदयासाठी शक्तिवर्धक आहे. ते हृदयास शक्ति आणि नियमितपणा प्रदान करते.
पित्तशमनसाठी ब्राम्हीचा स्वरस देतात. नीर ब्राम्हीमुळे लघवीचे प्रमाण वाढते. मूत्रदाह, शूल, लघवीतुन रक्त पडणे, मूतखडा यांमधे नीरब्राम्हीचा उपयोग होतो. ब्राम्ही स्वरसात, त्रिफळा, कचोरा, वाळा इ. द्रव्ये टाकुन सिद्ध केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व मनःशांतिसाठी उपयुक्त आहे.

ब्राम्ही

संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
कूळः Apiaceae, Umbelliferae
इतर भाषिक नावे: मराठी- ब्राम्ही, कारिवणा, हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही, गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही, इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट
उपयोगी अंगः पंचांग (विशेषकरुन पाने)
या वनौषधीची पाने बेडकाच्या पंजासारखी दिसतात म्हणुन याला मण्डुकपर्णी म्हणतात.
त्वचेच्या रोगात ब्राम्ही उत्तम गुणकारी आहे. कुष्ठामध्ये त्वचेवर लेप करतात. ब्राम्ही रस व त्याच्य दहा पट तेल एकत्र करुन सिद्ध केलेले तेल डोक्याला लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. याने मेंदू थंड रहातो, केसांची वाढ होते, स्मृती वाढते. मनःशांतीसाठी तसेच शांत झोप लागण्यासाठी ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. रक्तशुद्धीवर, मेंदुच्या विकारांवर, जुनाट इसबावर ब्राम्हीच्या व गुंजेच्या पानांचा रस देतात. भूक वाढविण्यास ब्राम्ही अत्यंत उपयोगी आहे. कास, श्वास, स्वरभेदात, हृदय दौर्बल्यात ब्राम्ही उपयुक्त आहे. ब्राम्हीमुळे बुद्धीची धारणाशक्ती वाढते. पाने उकळुन तयार केलेला काढा महारोगावर वापरतात. क्षयरोगात, मूत्रकृच्छावर, अपस्मार/उन्मादावर याचा रस वापरतात. बोबडे बोलणा-या मुलांना ब्राम्हीची पाने खाण्यासाठी देतात.

पुनर्नवा

नावः पुनर्नवा
संस्कृत नावः पुनर्नवा, शोथग्नी, श्वेतमूला, दीर्घपत्रिका
इतर नावे: लाल पुनर्नवा, ठिकरी, सांठ, सारोडी
लॅटिन नाव-
कूळ- (पुनर्नवा कूळ)
उपयोगी भागः मूळ
उपयोगः बाह्य व अंतर्गत सूज आणणा-या रोगांवर पुनर्नवा उपयुक्त आहे. आणि ताजी वापरल्यास जास्त उपयोगी ठरते. मूत्रपिंडापासुन मूत्राशयापर्यंतच्या मार्गावर ही वनस्पती कार्य करते. नविन संधिवातात तात्पुरता फायदा होतो. ही फारशी तीव्र नाही पण एकेरी वापरुन याचा उपयोग दिसत नाही . ही नेहमी सुगंधी द्रव्याबरोबर वापरतात.

गेळ

नावः गेळ
संस्कृत नावः करहाट, विषपुष्पक, मदन
इतर नावे: गेळफळ, मैनफळ
लॅटीन नावः Catunaregam spinosa (Thunb.) Tirveng.
कूळः Rubiaceae (गेळफळ कूळ)
उपयोगी भागः फळे
उपयोगः आयुर्वेदामधे वमनचिकित्सेसाठी (उलटी घडवुन आणणे) गेळफळ श्रेष्ठ मानले जाते. त्यासाठी त्याचा गीर वापरला जातो परंतु हा प्रयोग तज्ञांच्या देखरेखीखालीच केला जातो.
गेळफळाची साल अतिसारावर उत्कृष्ठ काम करते. कुडासाल आणी गेळफळाची साल समभाग एकत्र करुन अल्सरेटिव्ह कोलायटीसवर वापरतात. हुरमळ बी, गेळफळाचा गीर, खैराची साल व पिंपळाची लाख एकत्र मिश्रण योग्य देखरेखीखाली वजन कमी करण्यास व त्याचबरोबर असलेले घोरणे, खोकला, सुस्ती , सांधेदुखी कमी करण्यास वापरतात.

कुरण्ड

संस्कृत नाव- शितवार, सितिवार, कुरण्डिका, क्षेत्रभूषाति
इतर नाव- कुरण्ड, कुरडु, सगेद मुर्गा, लोंपडी
लॅटिन नाव- Celosia argentea L.
कूळ - Amaranthaceae (आघाडा कूळ)
उपयोगी भाग- बिया, पाने व मूळ
बियांचे चूर्ण जेवढे बारीक करुन वापरता येइल तेवढे केल्यास अधिक लाभदायक. बियांचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास लघवीतुन जाणारी खर व मूतखडा यावर उपयुक्त. त्याबरोबर जि-याचे चूर्ण घेतल्यास लघवीतील जळजळ थांबते.

अश्वगंधा

संस्कृत नावः अश्वगंधा, वराहकर्णी
इतर नावे: आस्कंद, असगंध, ढोरगुंज
कुळ- Solanaceae (भुईरिंगणी कूळ)
लॅटिन नावः Withania somnifera
उपयोगी भागः मूळ
उपयोगः अश्वगंध हे सर्वांगाला पुष्टी देणारे आहे आणि सर्व वयोगटांसाठी आहे. अश्वगंधा तुपाबरोबर वापरल्यास अधिक उपयुक्त होते. मधाबरोबर दिल्यास अशक्तपणा येतो. रक्तातील दोषामुळे सांधे लाल होउन होणा-या संधिवातावर अश्वगंधा गुणकारी आहे. पार्किन्सस रोगामधे अश्वगंधा आणि कवचबीज एकत्र करुन दूध किंवा मधाबरोबर घेतात. स्त्रियांची कंबरदुखी यामुळे पूर्ण बंद होते तसेच बीजधारणा होण्यसाठी स्त्रियांना उपयुक्त आहे. नैसर्गीक झोप येण्यास झोपतांआ अश्वगंधा सूंठ तुपाबरोबर घेतात. मात्र सतत वापरु नये कारण त्यामुळे तोंड येणे, निद्रानाश, थरथर होते. तोंड आलेले असेल, मूळव्याध असेल , आजारपणानंतर आलेला अशक्तपणा असून तहानभूक कमी असेल तर अश्वगंधा वापरु नये. संधिवातावर फार गुणकारी. सांध्यांना चोळण्यासाठी अश्वगंधा व मोहरीचे तेल करुन वापरतात.